लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वातंत्र्यसैनिक दिवंगत ॲड. जे. जी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र आयोजित करून नवी दिशा देण्याचे काम केले जाणार असल्याचे फौंडेशनने स्पष्ट केले.
सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात जे. जी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. फौंडेशनचे कार्यवाह एच. वाय. पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर व्यापक बैठक घेऊन कार्यक्रमांचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार गाडगीळ म्हणाले की, पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे चर्चासत्र आयोजित करून सहकार क्षेत्राला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ म्हणाले की, पाटील यांच्यासोबत काम करताना ग्राहकांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न कसे सोडवावेत याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये कौन्सिलच्या माध्यमातून अनेक विधायक कामे त्यांनी केली.
यावेळी मराठा समाज अध्यक्ष ॲडण उत्तमराव निकम, फौंडेशनचे विश्वस्त संजय परमणे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास फौंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष ॲड. पंडित सावंत, जयवंतराव पाटील, संपतराव पाटील, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.