सांगली : पक्षातून आम्ही केव्हाच बाहेर पडलो आहोत. पुढील वाटचालीची चिंता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करू नये. समुद्रात कोण बुडणार हे लवकरच कळेल, असा प्रतिटोला माजी मंत्री अजितराव घोरपडे व विलासराव जगताप यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना लगावला. गृहमंत्री आर. आर. पाटील व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. घोरपडे म्हणाले की, आम्ही आमदारकीसह मंत्रीपदही उपभोगले आहे. त्यामुळे आमदारकीची स्वप्ने आम्हाला पडत नाहीत. पक्षातून जाण्याचा सल्ला त्यांनी देण्याचे कारण नाही. आम्ही केव्हाच पक्ष सोडला आहे. अधिकृतरित्या पक्ष सोडला नसल्याचे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी जगतापांप्रमाणे खुशाल आमची हकालपट्टी करावी. आम्ही उघडपणे भाजपच्या नेत्यांबरोबर फिरत आहोत. लपवालपवी करण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही कधीही पक्षाकडे पद मागितले नव्हते. त्यामुळे संधी दिल्याचा गाजावाजा त्यांनी करू नये.जगताप म्हणाले की, आमची नेत्यांवर नाराजी आहे. पक्षाने त्याबाबतची दखल घेतलेली नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे कोण बुडणार आणि कोण तरणार, हे जनता आणि काळच ठरवेल. जयंत पाटील यांच्याशी आमचे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत. पक्षीय पातळीवर वाटा वेगळ्या असल्या तरी, आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा यापूर्वी झालेली नाही. पक्ष सोडण्याच्या भूमिकेवरही त्यांच्याशी चर्चा झाली नाही. त्यामुळे या गोष्टीमुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुष्काळी फोरम आजही कायम आहे. तो पक्षविरहीत असल्याने आमच्यात कटुता नाही. (प्रतिनिधी)पाय कुणी धरले?२00९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी अजितराव घोरपडे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. त्यावेळी घोरपडे यांचे पाय कोणी धरले होते? गयावया कोण करत होते? आता उसने अवसान आणून आर. आर. पाटील यांनी ताकदीचे प्रदर्शन करू नये, अशी टीका घोरपडे आणि जगताप यांच्यासोबत पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या खासदार संजय पाटील यांनी यावेळी केली.
समुद्रात कोण बुडणार हे लवकरच कळेल!
By admin | Updated: August 12, 2014 23:37 IST