मिरज : शेतकऱ्यांनी एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरल्यानंतरच म्हैसाळ योजना सुरू होणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी बुधवारी सांगितले, तर टंचाई निधीतून म्हैसाळचे थकीत बिल भरले जाणार नाही. पाणीपट्टीची रक्कम भरली नाही, तर पंपहाऊसला टाळे ठोकून म्हैसाळ योजनेचे खासगीकरण करावे लागेल, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी येथे स्पष्ट केले. पाणी संघर्ष समितीतर्फे मिरजेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या मागणीसाठी मिरजेत शेतकरी, प्रशासन व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. आवर्षण व दुष्काळी परिस्थितीत थकीत पाणीपट्टी भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नसल्याने म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी केली. त्यावर खा. पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी जूनपर्यंत सहा महिन्यांसाठी एकरी पाच हजार रुपये भरल्यास पाणी सुरू करता येईल. योजनेच्या २० कोटी थकबाकीपैकी ३३ टक्के माफ करण्यात आले आहेत. यापूर्वी थकबाकी न भरता आवर्तन सुरू केल्याने आता पाणीपट्टीची रक्कम भरल्याशिवाय पाणी सुरू होणार नाही. शेतकऱ्यांनी वर्षाला केवळ सात हजार रुपये भरल्यास वर्षातून ५० दिवसांची चार आवर्तने याप्रमाणे पाणी सोडण्यात येईल. जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, आपल्याकडे जूनपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. म्हैसाळची पाणीपट्टी वसुली आता महसूल विभागातील तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखान्यामार्फत भरण्याच्या निर्णयाबाबत सभासद शेतकऱ्यांसोबत विचारविनिमय करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. बैठकीत एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरण्याच्या निर्णयास काही शेतकऱ्यांनी विरोध करीत मागील थकबाकी टंचाई निधीतून भरा, त्यानंतर पुढील आवर्तनाची पाणीपट्टी शेतकरी देतील, असे सांगितले. बैठकीस तहसीलदार किशोर घाडगे, गजेंद्र कुळ्ळोळी, खंडेराव जगताप, दिनकर पाटील, काँग्रसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, जि. प. सदस्य प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई, परशुराम नागरगोजे, प्रकाश इनामदार उपस्थित होते. (वार्ताहर) ...तर पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण टंचाई निधीतून थकीत बिल भरले जाणार नाही. पैसे भरण्याची शेतकऱ्यांची तयारी नसेल, तर म्हैसाळ पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण करावे लागेल. म्हैसाळच्या पाण्यासाठी ही अंतिम बैठक आहे. पुन्हा या विषयावर बैठकीची तयारी नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सुनावले. पतंगरावांची गुगली कशासाठी ? पतंगराव कदम यांचे नाव न घेता खा. संजय पाटील म्हणाले की, ताकारी योजनेतून पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे नेते दीड कोटीचा धनादेश देतात व दुसऱ्यादिवशी म्हैसाळ योजनेची थकबाकी टंचाई निधीतून भरता येणे शक्य असल्याची गुगली टाकतात. म्हैसाळ योजना सुरू राहावी, यासाठी पाणीपट्टी भरण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. कोणीही पाण्याचे राजकारण करून योजना बंद पाडू नये.
पाणीपट्टी भरल्यानंतरच ‘म्हैसाळ’ सुरू
By admin | Updated: January 14, 2016 00:09 IST