प्रवीण जगताप - लिंगनूर -नववर्षाच्या पूर्वसंध्येला विकासनगर (बेळंकी, ता. मिरज) येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळेच्या द्वितीय वर्षातील पुनर्मानांकनासाठी आज (बुधवारी) पाहणी व परीक्षण करण्यात आले. त्यानंतर टीयूव्ही आॅस्ट्रीया या कंपनीच्या राजीव जम्मीहाल व राजेंद्र जैन या अधिकाऱ्यांनी शाळेस पुन्हा द्वितीय वर्षासाठी पुनर्मानांकन कायम करण्यात आल्याचे घोषित केले. भारतातील आयएसओ मानांकन मिळविणारी पहिली सरकारी द्विशिक्षकी शाळा, असा बहुमान जिल्हा परिषदेच्या विकासनगर (बेळंकी) शाळेने पटकावला आहे. आयएसओच्या द्वितीय वर्षातील पुनर्मूल्यांकनासाठी आज टीयूव्ही आॅस्ट्रीया या कंपनीच्या प्रतिनिधींनी शाळेचे परीक्षण केले. त्यानंतर पालक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थांसमोर पुनर्मानांकनाबाबत घोषणा केली, अशी माहिती विकासनगर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी दिली.कंपनीने गतवर्षी १० डिसेंबररोजी शाळेची पाहणी केली होती व आयएसओ मानांकनाची घोषणा करून तसे प्रमाणपत्र दिले होते. कंपनीच्या नियमावलीनुसार दरवर्षी गुणवत्तेत वाढ, मागील गुणवत्तेतील सातत्य व दुसऱ्या वर्षात निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे किती, कोणती व कशाप्रकारे साध्य केली, यासह कार्यालयीन दफ्तरातील अद्ययावतता व सर्वांगीण गुणवत्तेची पुन्हा कसून पाहणी करण्यात आली. नव्याने राबविलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले. शाळेत मागील अनेक वर्षांपासून ३५ उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, शिक्षक चंद्रकांत साळुंखे, प्रिया पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कोरे, अर्थ व नियोजन समिती अध्यक्ष अमृतकिरण कोरे, मोहन कोरे, अण्णासाहेब कोरे, संजय चौगुले, महादेव माळी, राजाराम जासुद, उदय पाटील, नायकू जतकर, मनोज बनकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. घोषणेनंतर फटाके वाजवून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.प्रसन्न वातावरण, नवे उपक्रम, वाढणारी पटसंख्या ही वाढत्या गुणवत्तेची प्रतीके आहेत. आपल्या गुणवत्तेची सरकारी शाळांनी प्रसिद्धी केली पाहिजे. शक्य तेथे सोशल कंपन्या व संस्थांची मदत घ्यावी. विकासनगर येथे पाणी शुद्धीकरणासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात यावा. - राजीव जम्मीहाल, प्रतिनिधी, टीयूव्ही आॅस्ट्रीया कंपनी.
विकासनगर शाळेस यंदाही आयएसओ मानांकन
By admin | Updated: December 31, 2014 23:56 IST