इस्लामपूर : शेकडो वर्षांची परंपरा असणारी येथील राजेबागेश्वरची गुढीपाडव्याच्या दिवशी दि. १३ एप्रिल रोजी होणारी यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी आणि पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाटील म्हणाले, हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रतीक असणाऱ्या राजेबागेश्वर ग्रामदैवताची यात्रा गुढीपाडव्याला भरत असते. या दिवशी साधारण २० ते ३० हजार यात्रेकरू समाधीस्थळी दर्शनासाठी येत असतात. यात्रेमध्ये अनेक गावांहून येणारे भक्त, परराज्यातून येणारे व्यापारी, स्टॉल, मनोरंजनाची खेळणी, दुकाने यात्रास्थळी लागलेली असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय आदेशानुसार ही यात्रा होणार नाही. या दिवशी कोणीही भक्तांनी समाधीस्थळी येऊ नये. दर्शन, महाप्रसाद, कंदुुरी यासह पूजेचे सर्व विधी रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांनी प्रशासन आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.