इस्लामपूर : नगरपालिका सभाग्रहाने अतिक्रमणे काढण्याचा अधिकार दिल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी थेट नागरिकांच्या आणि विशेषतः या परिसरातील महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या जुन्या गणेश मंडईलाच अतिक्रमणाच्या नावाखाली हात घातला. त्याचे संतप्त पडसाद शनिवारी सकाळी उमटले. पोलीस बळाचा वापर करून भाजी विक्रेत्यांना हटकल्यावर त्यांनी थेट पालिकेच्या आवारात मंडई भरवत प्रशासनाच्या दादागिरीला आव्हान दिले. यामुळे हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मुख्याधिकारी माळी या सर्व घटनेवर मौन बाळगून आहेत.
१०० वर्षांचा इतिहास असणारी ही गणेश मंडई तालुक्यात प्रसिद्ध आहे. जवळपास २०० हून अधिक शेतकरी, छोटे व्यापारी येथे व्यवसाय करून आपली उपजीविका चालवतात. गेल्या दोन दिवसांपासून गणेश मंडई बंद करण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. येथील विक्रेत्यांना डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत जबरदस्तीने बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, तेथे फक्त ३०-३५ व्यापारीच बसू शकतील, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे भाजीपाला घेऊन येणारा शेतकरी, व्यापारी बसल्यास ग्राहकाला ये-जा करण्यासाठी जागा उरत नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी प्रशासनाने पोलीस आणून काहींचा भाजीपाला जप्त करत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. तसेच जुन्या मंडईत बसल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे संतप्त झालेला शेतीमाल विक्रेत्यांनी थेट पालिकेच्या आवारातच मंडई भरवत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला.
माल भारी, लै भारी, घ्या उरणातलं वांगं १० रुपये किलो, १० रुपये किलो.. आला उन्हाळा घ्या लिंबू. घ्या देशी केळी…अशा आरोळ्यांनी पालिकेचे आवार दुमदुमून सोडले. त्यामुळे वातावरण तापले होते. जुन्या मंडईत भाजी घेणारे नागरिकही पालिका आवारात येऊन भाजी घेऊ लागले. त्यामुळे गर्दीही झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ठेवण्यात आले होते.
यावेळी संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी, महाडिक युवाशक्तीचे कपिल ओसवाल, मन्सूर वाठारकर, सोमनाथ फल्ले, मनसेचे सनी खराडे, स्वाभिमानीचे अनिल करळे, प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील यांनी पालिका प्रशासन जोपर्यंत योग्य निर्णय घेत नाही, तोपर्यंत दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ही भाजी मंडई पालिका आवारातच भरेल, असा इशारा दिला. पालिकेचे कर्मचारी प्रत्येक व्यापाऱ्याचे नाव आणि संपर्क क्रमांक घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तापलेले वातावरण पाहून त्यांनी माघार घेत बाजूला जाऊन थांबण्यात धन्यता मानली.
सर्वांचा पाठिंबा..!
गणेश भाजी मंडईतील प्रत्येक घटकाने पालिकेच्या या कृतीचा निषेध केला आहे. सर्वांसाठी सुरक्षित असणाऱ्या जागेतून या छोट्या व्यापाऱ्यांना हलवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. पालिकेने कुणाला कुठे बसायचे आहे, हा निर्णय ऐच्छिक करावा. त्यामुळे वाद होणार नाही, अशी भावना व्यक्त करत या परिसरातील नागरिक, महिला आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी जुन्या गणेश भाजी मंडईतच बाजार भरला पाहिजे, यासाठी पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.