लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक नेते सध्या विविध उपक्रम राबवीत आहेत. राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी असून, त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निर्णय घेतील. सत्ताधारी विकास आघाडीत मतभेद आहेत; मात्र त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तोडगा काढणार आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची ताकद पणाला लागणार आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतील धुसफूस, उमेदवारी देताना झालेल्या चुकांमुळे जयंत पाटील गटाची ३१ वर्षांची सत्ता गेली. यातून सावरण्यासाठी पाटील यांनी नुकत्याच प्रभागनिहाय बैठका घेतल्या. त्यांनी राष्ट्रवादीची भक्कम बांधणी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बंडखोरी होण्याची शक्यता असली, तरी त्यावर पाटील तोडगा काढतील, असे कार्यकर्ते सांगत आहेत. राष्ट्रवादीबरोबर शिवसेना, स्वाभिमानी संघटना आघाडी करतील; परंतु ते स्वत:च्या चिन्हांवर लढतील.
सत्ताधारी विकास आघाडीत चार वर्षांत वेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा एकहाती कारभार, पक्षप्रतोद विक्रम पाटील यांचा सवतासुभा, महाडिक गटाची स्वबळाची भूमिका, तर शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि निशिकांत पाटील यांच्यातील दुहीने आघाडीत सध्या फूट पडली असली, तरी आगामी निवडणुकीपर्यंत या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रयत्नशील आहेत. त्यांनी बैठका घेतल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात विकास आघाडीच्या झेंड्याखाली सर्वजण एकत्र येतील याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ताकद पणाला लागणार आहे.
फोटो - ०३०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज