अशोक पाटील - इस्लामपूर = उमेदवारी निश्चित झालेली नसली, तरी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात नानासाहेब महाडिक, तर शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांच्याविरोधात माजी मंत्री शिवाजीराव नाईक अशा दुरंगी लढती होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात नैमित्तिक, सुख-दु:खाच्या प्रसंगांना उपस्थिती लावण्यासाठी पाठशिवणीचा खेळ सुरू केला आहे.इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात महाआघाडीतून नानासाहेब महाडिक यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे आठवडाभरात महाडिक काँग्रेस पक्षाला रामराम करून खासदार राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक यांच्यासोबत हातमिळवणी करतील आणि तिकीट मिळवतील, अशी चर्चा आहे. सध्या जयंत पाटील ज्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात, त्याच ठिकाणी नानासाहेब महाडिक यांचे दर्शन घडू लागले आहे. अशीच परिस्थिती शिराळा मतदारसंघातही आहे. कोणताही कार्यक्रम असो, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांची उपस्थिती ठरलेलीच, असे चित्र आहे. विद्यमान आमदार असल्याने मानसिंगराव नाईक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याने सत्यजित देशमुख यांना तलवार म्यान करून आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे. यामुळे येथे दुरंगी लढत होईल, असे संकेत मिळत आहेत.शिराळा मतदारसंघातील चित्र स्पष्ट आहे, तर इस्लामपूर मतदारसंघात उमेदवाराविषयी अजूनही तिढा सुटलेला नाही. महाडिक यांचा महायुतीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. १७ ते २० आॅगस्टदरम्यान त्यांच्या प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.शिराळा मतदारसंघातील जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता असून, शिवाजीराव नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात दुरंगी लढत निश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही ठिकाणी दिग्गज नेते मैदानात उतरणार असल्याने या दोन्ही मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
इस्लामपूर, शिराळ्यात पाठशिवणीचा खेळ
By admin | Updated: August 13, 2014 23:36 IST