अशोक पाटील : इस्लामपूरलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेले यश वाळवा-शिराळ्यात आळवावरचे पाणी ठरणार का? अशीच परिस्थिती आहे. इस्लामपूर मतदारसंघात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आगामी विधानसभा रणांगणात सुरक्षित असल्याचा अहवाल एका सर्व्हे करणाऱ्या खासगी एजन्सीने दिला असल्याचे समजते, तर शिराळ्यात मात्र माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या जनमताचा टक्का वाढल्याने विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांच्याविरोधात चुरशीची निवडणूक रंगणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. या दोन साखरसम्राटांविरोधात लढताना महायुतीच्या नेत्यांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींविरोधात जयंत पाटील यांच्यामध्येच लढत होती, असे मानले जाते. वाळवा-शिराळा या दोन तालुक्यांवर मंत्री जयंत पाटील आणि विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. तरीसुध्दा शेट्टी यांनी बाजी मारल्याने राष्ट्रवादीच्या मताचा टक्का घसरला असल्याने याचे आत्मचिंतन करण्याची वेळ जयंत पाटील यांच्यावर आली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जनमताचा कौल कोणाकडे आहे, याचा एका खासगी एजन्सीने सर्व्हे केला असल्याचे समजते. जयंत पाटील यांच्याविरोधात खमके नेतृत्व नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील सुरक्षित असल्याचा निर्वाळा काही राजकीय तज्ज्ञांनी दिला आहे. शिराळा मतदारसंघात आमदार नाईक यांच्याबरोबर सध्यातरी कॉँग्रेसचे सत्यजित देशमुख दिसत आहेत. त्यामुळे या दोघांच्या ताकदीला माजी मंत्री शिवाजीराव नाईक महायुतीचा झेंडा घेऊन आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र गत निवडणुकीत त्यांच्यापासून दुरावलेले नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील यांची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आघाडी कॉँग्रेसच्या नेत्यांना शह देण्यासाठी शिराळा मतदारसंघात महायुतीची दमछाक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचे वारे जोराने वाहू लागले होते. परंतु, सध्या पावसाने दगा दिल्याने राज्यासह वाळवा-शिराळ्यातील खरीप पिके धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यातच पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे विधानसभेचे वारे आणि नेत्यांची मोर्चेबांधणी थंडावली आहे. असे असतानाही इस्लामपूर मतदारसंघात जयंतरावांच्या विरोधात खमक्या उमेदवार देण्यासाठी महायुतीतून हालचाली गतिमान झाल्या आहेत. अद्याप अशा नेत्याचा शोध त्यांना लागलेला नाही. काही नेते मुंबई येथे जाऊन मातोश्रीच्या दारात ठाण मांडून आहेत. परंतु, जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? याबाबत महायुतीतील राज्यस्तरीय नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत.
इस्लामपूर सुरक्षित, शिराळ्यात चुरस
By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST