इस्लामपूर : इस्लामपूर शहरामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आजअखेर १,४५५ झाली आहे. मात्र, त्यातील १,२२५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या १७९ सक्रिय रुग्ण विविध ठिकाणी उपचाराखाली आहेत तर ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८४.१९ टक्के असून, मृत्यूदर ३.५० टक्के राहिला आहे.
शहराला मार्च २०२०पासून कोरोनाच्या संसर्गाने ग्रासले आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोनाचा सर्वच पातळ्यांवरून कठोर उपाययोजना आखण्यात आल्याने मुकाबला करता आला होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात त्यामध्ये टाळाटाळ झाल्याने शहरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा मोठा प्रादुर्भाव सोसावा लागला.
दुसऱ्या लाटेत शहरातील सर्वच भागात कोरोनाचा संसर्ग पसरला होता. त्यातच मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांनी घरीच राहून उपचार करण्याला प्राधान्य दिले. मात्र, याठिकाणी संसर्ग टाळण्यासाठी जे नियम पाळले गेले पाहिजे होते, त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक कुटुंबातील बरेच सदस्य कोरोनाबाधित होण्याचे प्रकार घडले.
सध्या शहरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १७९ आहे. त्यातील १४० रुग्ण आजही घरीच उपचार घेत आहेत. दत्त टेकळीजवळील कोविड केअर सेंटरमध्ये १८ रुग्ण उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात ४ रुग्ण तर १७ रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.