जत : जत पाटबंधारे विभागातील कार्यालये व निवासस्थानांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. सांगलीतील वारणाली वसाहतीच्या धर्तीवर येथे नूतनीकरण व सुशोभिकरण करावे, अशी मागणी जतमधील नागरिकांतून होत आहे.
जत तालुक्यातील म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचे काम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी या योजनेचे कार्यालय जत येथील पाटबंधारे काॅलनीतील पाटबंधारे कार्यालयात सुरू केले आहे. येथे २० ते २५ शासकीय निवासस्थाने आहेत. त्यापैकी फक्त तीन ते चार निवासस्थानांंमध्ये कर्मचारी राहात आहेत. या वसाहतीमध्ये रखवालदार नाही. काही निवासस्थाने कुलुपे लावलेली तर काही निवासस्थाने सताड उघडी असतात. त्यामुळे चोऱ्या होत आहेत.
दगडी कुंपणाची भिंत काही ठिकाणी ढासळली आहे. नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने चर काढून माती टाकून हे भगदाड बुजवले असले तरी दिवसभर या ठिकाणाहून मोकाट जनावरे वसाहतीत घुसतात. रात्री विद्युत खांबावरील दिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेत या वसाहतीमध्ये वारंवार चोऱ्या होत आहेत. तसेच याठिकाणी असलेल्या उघड्या खोल्यांचा वापर तळीराम करतात. जागोजागी अस्वच्छता, काटेरी झुडपे वाढली आहेत. काही वाहने गंज खात उभी आहेत.
चाैकट
विश्रामगृह शेवटच्या घटकेत
येथील विश्रामगृह तर शेवटची घटका मोजत आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. याठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राहावे, अशी अवस्था नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली येथील वारणाली वसाहतीप्रमाणेच जत पाटबंधारे वसाहत, कार्यालय, विश्रामगृह, निवासस्थानांचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.