: कृष्णाकाठावरून विद्युत पंपाच्या केबल, मोटारी तसेच ट्रॅक्टर आदी शेतकऱ्यांच्या साहित्य चोरीच्या घटना वाढत आहेत. पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन छडा लावावा, असा आदेश कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी भिलवडी (ता. पलूस) येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. शेतातून होणाऱ्या केबल व वाहन चोरींचा छडा लावण्याची मागणी केली.
भिलवडी आपत्ती व्यवस्थापन समितीच्यावतीने तलाठी जी. बी. लांडगे यांनी कोविड उपाययोजनांचा आढावा सांगितला.
अत्यावश्यक बाब म्हणून कृषी दुकाने व खत सेंटर सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
याबाबत कदम म्हणाले की, शासन पातळीवरून योग्य तो निर्णय घेतला जाईल. लसीच्या उपलब्धतेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच आरोग्य उपकेंद्रामध्येही नियोजन केले जाईल.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, संग्राम पाटील, सरपंच सविता महिंद-पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रामसेवक अजित माने,
शहाजी गुरव, बाळासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
फोटो -भिलवडी येथे नागरिकांशी संवाद साधताना डॉ. विश्वजित कदम, शेजारी गणेश मरकड, निवास ढाणे, संग्राम पाटील, बाळासाहेब मोहिते आदी.