सांगली : एरंडोली (ता. मिरज) येथे बनावट कागदपत्रांचा वापर कर्जप्रकरण यांसह विद्युत कनेक्शन आणि अन्य शासकीय योजनांसाठी लाभ घेतला गेला असून याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सरपंच वासंती धेंडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
एरंडोलीमध्ये बनावट शिक्के, बोगस लेटरहेड, खोट्या सह्या या आधारे विविध शासकीय आणि खासगी कामांसाठी बोगस दस्तऐवज तयार करण्याचे काम या टोळीमार्फत केले गेले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकरणी सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात एरंडोली ग्रामपंचायतीमध्ये दोन बोगस पावती पुस्तकांच्या आधारे घरपट्टी घोटाळा उघडकीस आला होता. त्या प्रकरणात एका शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
ग्रामपंचायतीत कागद हाताळणीत सराईत असणारी ही टोळी आहे. या टोळीने ग्रामपंचायतीचे बोगस शिक्के बनवून घेतले आहेत. काही लेटर पॅड बनविले आहेत. शिवाय दाखल्यावर सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या बोगस सह्या केल्या आहेत. एका व्यक्तीच्या नावावरचे घर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर दाखवून खोटे उतारे दिल्याचे पुरावे जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. त्याला ना हरकत दाखला दिला आहे. सरपंचांनी या दाखल्याचा जाहीर पंचनामा केला आहे. ही बनावट कागदपत्रे तयार करणारे लोक कोण आहेत याचा शोध घेतला असता काही नावे समोर आली आहेत. त्यांची नावेही जिल्हा परिषदेकडे कळविण्यात आली आहेत. बनावट कागदपत्रांचा वापर कर्जप्रकरण यांसह विद्युत कनेक्शन आणि अन्य शासकीय योजनांसाठी लाभ घेतला गेला असावा, असा संशय असल्याने याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सरपंच धेंडे यांनी केली आहे.