मिरज : निवडणूक निकालानंतर सत्ता बदलाची शक्यता गृहित धरून मिरजेतील अवैध व्यावसायिकांनी पुन्हा मटका व्यवसाय सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. चोरून सुरू असलेला मटका खुलेआम सुरू करण्यासाठी राजकीय नेत्यांना साकडे घालण्यात आल्याची चर्चा आहे. मटका व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या मिरजेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होती. मात्र गेल्या दहा वर्षात गृहखात्याच्या आदेशामुळे मटका व्यवसायावर संक्रांत आली. मिरजेतील मटका बुकींनी सीमेपलीकडे स्थलांतर केले. मटका एजंट म्हणून काम करणारे अन्य व्यवसायांकडे वळले आहेत. गेल्या दहा वर्षात पोलीस यंत्रणेने मटका व्यवसायाबाबत कठोर पवित्रा घेतल्याने कर्नाटकात मटका व्यवसाय व जुगार क्लब जोमात आहेत. पोलीस यंत्रणा विधानसभा निवडणुकीत गुंतल्यानंतर चोरून मटका सुरु झाल्याची चर्चा होती. मात्र आता निवडणूक निकालानंतर सत्ता बदलाची शक्यता गृहित धरून मिरजेतील मटका बुकींचे पुन्हा बस्तान बसविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने पुन्हा मटका सुरू व्हावा, यासाठी अवैध व्यावसायिकांची धडपड सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलीस यंत्रणेने गेल्या दहा वर्षात बंद पाडलेला मटका सुरू होणार काय, याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळणार आहे. मात्र अवैध व्यावसायिकांचे मनोधैर्य पुन्हा वाढले आहे. (प्रतिनिधी)
अवैध व्यावसायिकांची धडपड
By admin | Updated: October 18, 2014 23:42 IST