लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील युवा संशोधक शशांक कुलकर्णी यांना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्गनाईज्ड रिसर्च या संशोधन व शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय युवा संंशोधक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराची घोषणा संचालक डॉ. एस. एन. मेहता व टी. सिंह यांनी केली आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने निर्धारित केलेल्या शाश्वत विकास ध्येयधोरणांतर्गत २०३० पर्यंत गरिबी निवारण, पृथ्वीचे रक्षण व जागतिक शांतता या वैश्विक पातळीवरील ध्येयाच्या पूर्ततेसाठी साहाय्यभूत ठरणारे संशोधन कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांनी ‘स्वामिनाथन कमिशन : अ फाउंडेशन ऑफ फार्मर पॉलिसीज इन इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून कृषी आणि शेतकरी धोरणात विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कुलकर्णी हे सध्या जम्मू केंद्रीय विद्यापीठामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे वरिष्ठ संशोधक म्हणून लोकनीती व लोकप्रशासन या विभागात संंशोधन करीत आहेत.