सांगली : उमेदवारांची वाढलेली धडधड, कार्यकर्ते, नागरिकांमध्ये शिगेला गेलेली उत्सुकता, चर्चा आणि अंदाजांना आलेले उधाण यांना पूर्णविराम देत उद्या, रविवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जिल्ह्यातील तुल्यबळ लढतींमुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, निकालानंतर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत. गेले महिनाभर विधानसभा निवडणुकीचा धडाका सुरू होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत दिग्गज नेते रिंगणात आहेत. सहा माजी मंत्र्यांसह सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अनेकांच्या अस्तित्वाची ही लढाई असल्यामुळे या उमेदवारांवर निकालाबाबत कमालीचे दडपण आले आहे. प्रथमच चौरंगी, पंचरंगी आणि बहुरंगी लढती होत असल्याने निकालाबाबतचे अंदाज बांधणे मुश्कील होत आहे. उमेदवारही संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली आहे. कार्यकर्ते, उमेदवारांचे समर्थक आणि नागरिकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या दुपारी बारापर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा फैसला होणार आहे. मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. कोणाच्या घरी दिवाळी ?आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि खरी दिवाळी कोणाच्या दारी साजरी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आठ विजयी उमेदवार वगळता अन्य ९९ उमेदवारांच्या पदरी निराशा येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी कोणासाठी लाभदायी ठरणार, याची चर्चा रंगली आहे.
जिल्ह्यात निकालाची उत्सुकता शिगेला
By admin | Updated: October 18, 2014 23:52 IST