अविनाश कोळी -सांगली नियमबाह्य कामांची कोटीच्या कोटी उड्डाणे करून जिल्हा बॅँकेत वादग्रस्त कारभाराची बीजे रोवणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी आता ‘एकात्मिक सहकारा’चा नारा दिला आहे. कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात वादग्रस्त ठरलेल्या नेतेमंडळींना आता सहकाराच्या भल्यासाठी एकत्रित येण्याची गरज वाटू लागली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले नेते चुंबकाप्रमाणे एकमेकांकडे खेचले जात आहेत. कधी १५७ कोटी रुपयांचा, तर कधी सव्वाचार कोटीचा गैरव्यवहार लेखापरीक्षणाच्या माध्यमातून उजेडात येताना जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची नावे त्यात प्रकाशझोतात येतात. वादग्रस्त कारभाराला ते जबाबदार असल्याचे शेरे मारले जातात. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी प्रदीर्घ काळ या बॅँकेवर वर्चस्व राखले. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील बहुतांश नेत्यांनी जिल्हा बॅँकेत प्रतिनिधित्व केले. दिग्गज राजकारणी म्हणून नावारूपाला आलेल्या अशा अनेक नेत्यांची नावे आता जिल्हा बॅँकेच्या गैरव्यवहारात रंगली आहेत. माजी मंत्री मदन पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, विलासराव शिंदे, मोहनराव कदम, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख, इद्रिस नायकवडी, विजय सगरे, प्रा. सिकंदर जमादार, दिलीप वग्याणी, बी. के. पाटील, शंकरदादा पाटील, दिनकरदादा पाटील, महेंद्र लाड, रणधीर नाईक आदी दिग्गजांचा यात समावेश आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बदलल्याने पूर्वी दोनच पक्षात विभागले गेलेले हे नेते आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा चार पक्षांमध्ये कार्यरत झाले आहेत. पक्ष वेगवेगळे असले तरी, जिल्हा बॅँकेबाबत त्यांची भावना समान आहे.जिल्हा बॅँकेची निवडणूक येत्या ५ मे रोजी होणार आहे. कार्यक्रम जाहीर झाल्याने सहकाराच्या नावाखाली यातील बहुतांश नेत्यांनी एकात्मतेचा नारा दिला आहे. पक्ष, गट-तट विसरून एकत्रित येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. किती नेत्यांना निवडणूक लढविता येणार, किती नेत्यांना बॅँकेपासून अलिप्त रहावे लागणार, हा विषय गुलदस्त्यात असला तरी, पुन्हा हेच कारभारी जिल्हा बॅँकेवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. समदु:खी एकत्र येण्याची चिन्हेसहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे यापूर्वीच जाहीर केल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अडचणी वाढणार आहेत. तरीही राष्ट्रवादी, कॉँग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी भाजप नेत्यांना साद दिली आहे. त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, हा चर्चेचा विषय आहे. जिल्हा बॅँकेच्या जुन्या कारभारातून समदु:खी झालेले नेते सहकाराच्या नावावर एकत्र येण्याची दाट शक्यता दिसत आहे. भाजपचे नेते खासदार संजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. सहकाराबद्दल आस्था असणाऱ्यांनी एकत्रित यावे, असा आमचा विचार आहे. यासंदर्भात पक्षीय बैठकीत ठोस भूमिका ठरेल. तोपर्यंत ज्यांना इच्छा आहे, अशा सर्वांनी उमेदवारी अर्ज भरावेत. - मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेससहकारात राजकारण नको म्हणून सर्वांनी पक्षविरहीत एकत्रित यावे, असे आमचे मत आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनाच आवाहन केले आहे. यासंदर्भात निश्चित भूमिका ठरविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. - विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
वादग्रस्त नेत्यांचा एकात्मिक सहकार...
By admin | Updated: March 31, 2015 00:25 IST