मिरजेतील शिवाजी रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, या रस्त्याच्या मालकीवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ता दुरुस्तीचे काम रखडले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा रस्ता असल्याचे निश्चित झाल्यानंतर आ. सुरेश खाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी २७ कोटी रुपयांचा निधी मिळविला. राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ता कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक व्ही.डी. पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग विभागप्रमुख सी.बी. भर्डे, महापालिका आयुक्त कापडनीस यांच्यासह आ. सुरेश खाडे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, मोहन वनखंडे यांनी मंगळवारी शिवाजी रस्त्याची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या प्रस्तावित कामाबाबत माहिती दिली.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम होत असल्याने महापालिकेने रस्ता अतिक्रमणमुक्त करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे द्यावा. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल, असेही आ. सुरेश खाडे यांनी बजावले.