मिरजेत मीरासाहेब दर्गा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक आहे. दर्गा आवारात फुले व पूजा साहित्य विक्री करणाऱ्या आवेझ मुश्रीफ यांचा चार वर्षाचा मुलगा झोयेफ याने गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर विक्रीस आलेल्या गणेशमूर्ती पाहून घरात गणेशमूर्ती आणण्याचा हट्ट धरला. त्याचा हट्ट पुरविण्यासाठी आवेझ यांनी घरात गणेश प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. दहा दिवस मोबाइलवर गणेश आरती लावून मुश्रीफ कुटुंबीयांनी गणेशाची पूजा केली. गणेशमूर्ती घरात आणल्यानंतर झोयेफने गणेशाच्या आरतीच्या वेळी दररोज ढोलताशा वाजवून आनंद व्यक्त केला.
रविवारी दहाव्या दिवशी विसर्जनासाठी या परिसरातील सर्वोदय गणेश मंडळाच्या मिरवणुकीसोबत झोयेफ मूर्ती घेऊन गणेश तलावात गेला. गणेश विसर्जनासाठी तलावात आलेल्या झोयेफने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मीरासाहेब दर्गा पुजारी बांधवांनी सार्वजनिक मंडळाच्या गणेशाची आरतीत सहभागी होऊन सलोख्याचे दर्शन घडविले होते. मुश्रीफ यांच्या घरातील गणेश प्रतिष्ठापनेचे अनेकांनी काैतुक केले.