इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कोविड उपचार रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बाहेरील स्क्रीनवर रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती मिळाली पाहिजे. तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागात तेथे उपलब्ध असणारी बेड संख्या, ऑक्सिजन साठा आणि व्हेंटिलेटरची माहिती फलकावर लावण्याचे बंधन जिल्हाधिकाऱ्यांनी घालावे, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक शकील सय्यद यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी येथील तहसील कार्यालयात दिले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था, सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. मात्र, तरीही कोरोनाचा संसर्ग वाढत जाऊन मृत्यूचे प्रमाण वाढते आहे, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शासनाने मोफत लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वरील मागण्यांसह प्रत्येक रुग्णालयात किती रेमडेसिविर इंजेक्शन शिल्लक आहेत अथवा नाहीत, याचाही तपशील रुग्णांच्या नातेवाइकांना समजला पाहिजे. तसेच प्रत्येक कोविड सेंटरच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी एक शासकीय समिती नेमून तेथील कामाचा दैनंदिन आढावा जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे बंधनकारक करावे, असेही सय्यद यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी नगरसेवक प्रदीप लोहार, अॅड. अविनाश पाटील, सूर्यकांत पाटील, संदीप पवार उपस्थित होते.