सांगली : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीला डावलून चिल्ड्रन पार्कसाठी ९० लाख ९२ हजार रुपयांचा निधी स्थायी समितीने मंजूर केला आहे. स्थायीने घेतलेला हा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारांवर गदा आणणारा असून, चिल्ड्रन पार्कची निविदा तत्काळ थांबवा. समितीची बैठक घ्या, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका आरती वळवडे यांनी सभापती गीतांजली ढोपे-पाटील यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्रच वळवडे यांनी बुधवारी सभापतींना दिले. त्यामुळे या निधीवरून महिला नगरसेविका विरुद्ध स्थायी समिती असा संघर्ष उफाळून आला आहे. वळवडे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक १७ मध्ये सि.स.नं. ३५२ या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर चिल्ड्रन पार्क विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ९० लाख ९२ हजार ८०० रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण समितीच्या बजेटमधून हा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीची परवानगी घेणे आवश्यक होते. पण, प्रशासनाने स्थायी समितीला हाताशी धरून परस्पर हा निधी चिल्ड्रन पार्कसाठी वळवला आहे. १४ जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत उपसूचनेद्वारे तसा ठराव करण्यात आला आहे.
तसेच ई निविदा मागविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. वास्तविक, महिला व बालकल्याण समितीला डावलून निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सभापतींना पत्र दिले आहे. महिला व बालकल्याण समितिची बैठक घ्या, निधी देण्याबाबत पुनर्विचार करा, अशी मागणी ढोपे-पाटील यांच्याकडे केली असल्याचे वळवडे यांनी सांगितले. दरम्यान, सभापतींनी दखल न घेतल्यास थेट न्यायालयात जाऊ. महिलांच्या अधिकारांवर गदा आणणारा हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू, असा इशाराही वळवडे यांनी दिला.