गजानन पाटील -- संख --शासनाने जत तालुक्यातील ५३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे, तर रब्बी हंगामातील ७० गावांची पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असूनही शासनाने अद्याप तेथे दुष्काळ जाहीर केलेला नाही. सध्या पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही. रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. असे असताना सुद्धा दुष्काळी परिस्थितीतही शासनाकडून कोणतीही पुरेशी मदत झालेली नाही. शासनाच्या या अजब कारभारामुळे दुष्काळी ७० गावांना मदतीपासून वंचित रहावे लागणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यामध्ये विस्ताराने सर्वात मोठा असा जत तालुका आहे. महसूल गावांची संख्या १२३ आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर इतके आहे. लागवडीखालील क्षेत्र १ लाख ५८ हजार ७०० हेक्टर आहे. खरीप क्षेत्र ६५ हजार ७०० हेक्टर, रब्बी क्षेत्र ९३ लाख ३०० हेक्टर आहे. मुलकी पड क्षेत्र १ हजार ९७० हेक्टर आहे. बागायत एकूण क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर, तर जिरायत क्षेत्र ६२ हजार २९९ हेक्टर आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२७.५ मि.मी., तर प्रमुख पिके ज्वारी, बाजरी मका व कडधान्य पिके आहेत.तालुक्यातील ५३ गावांत खरीप हंगामातील पिकांच्या आणेवारीवरून त्या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते. आॅक्टोबर महिन्यातील आणेवारीच्या निकषानुसार खरीप हंगामातील सर्वच गावची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याने दुष्काळ जाहीर झाला आहे. तालुक्यातील ५३ गावे खरीप व ७० गावे रब्बी हंगामाची, अशी विभागणी केली आहे.सध्या संपूर्ण तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. जत पश्चिम भागात म्हैसाळचे पाणी आलेली गावे वगळल्यास बाकीच्या ठिकाणी १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळी स्थिती आहे. ही गावे दुष्काळाने होरपळून निघत आहेत. मात्र शासनदरबारी केवळ ३० टक्के भागातच दुष्काळी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे म्हैसाळचे पाणी आलेल्या गावांचाही यात समावेश आहे. खरीप व रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे.रब्बी हंगामातील पिकांची पेरणीच झालेली नाही. काही भागात ३० टक्के पेरणी कशीबशी झाली होती. पावसाने पाठ फिरविल्याने १५ दिवसातच पिके करपून गेली. तेव्हापासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. गेल्या ८ महिन्यांपासून काही गावांत टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या १० महिन्यांपासून पुरेशा पाऊस नसलेल्या गावात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. तरीसुद्धा दुष्काळ जाहीर केलेला नाही, ही गंभीर बाब आहे. विशेषत: खातेदाराच्या ७/१२ उताऱ्यावर दोन्ही हंगामातील पिकांची नोंद केली आहे. पीकपाणी नोंद केलेली असते. अशा एकवाक्यता असताना सुद्धा इंग्रजकालीन १९२९ नोंदीवर एकाच तालुक्याची खरीप व रब्बी हंगाम अशा दोन हंगामात विभागणी केली आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे.भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आहे त्या गावात पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. चारा टंचाई निर्माण झाली आहे. असे असतानासुद्धा रब्बी हंगामातील गावे दुष्काळ जाहीर करायला दिरंगाई केली जात आहे. शासन तालुक्यात पाऊस पडण्याची वाट पाहतेय काय? असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे. रब्बी हंगामातील अमृतवाडी, बिळूर, जत, देवनाळ, मेंढीगिरी, शेगाव, उमराणी, खोजनवाडी, कुडनूर, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग, व्हसपेठ, काराजगी, मायथळ, घोलेवर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी (तिकोंडी), पारधेवस्ती, कोंतेवबोबलाद, कोणबगी, मोटेवाडी (को), अंकलगी, उमदी, कुळाळवाडी, आसंगी तुर्क, कागनरी, मोटेवाडी (अ), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ बु.।।, दरीबडची, लमाणतांडा (द. ब.), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकनाळ, आकळवाडी, बोर्गी (खु), विठ्ठलवाडी, गुळगुंजनाळ, बालगाव, हळ्ळी, उटगी, निगडी (बु), लमाणतांडा (उटगी), गिरगाव, लवंगा, बेवणूर, रेवनाळ, अचकनहळ्ळी, काशिलिंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, गुड्डापूर, दरीकोणूर, आसंगी ही ७२ गावे शासनाने केवळ निर्णय न घेतल्याने दुष्काळी सवलतीपासून वंचित राहिली आहेत.
जत तालुक्यातील ७० गावांवर अन्याय
By admin | Updated: May 25, 2016 23:33 IST