गांधी चौक, शिराळा नाका या परिसरातील रस्त्यांचे पॅचवर्क निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील मुख्य चौकासह काही रस्त्यांची मलमपट्टी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु या कामाचा दर्जा पाहता रस्त्याची परिस्थिती जैसे थे झाली आहे. या निकृष्ट कामाचा इंद्रप्रस्थ नागरी पतसंस्थेचे संचालक विजय पाटील यांनी पंचनामा केला आहे. पॅचवर्क करूनही रस्त्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था जीवघेणी बनली होती. त्यामुळे ठिकठिकाणी पॅचवर्क केले जात आहे. गांधी चौक, तहसीलदार कार्यालय नजीकचे रस्ते, शिराळा नाका परिसर आदी ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. ठेकेदाराकडून हे काम निकृष्ट होत असल्याचे इंद्रप्रस्थ नागरी पतसंस्थेचे विजय पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणले. तरीसुद्धा या कामामध्ये सुधारणा तर झालीच नाही. उलट डांबराऐवजी जळके तेल वापरले जात आहे. खडी मातीमिश्रित रस्त्यावर पसरली जात आहे. त्यामुळे काही तासातच रस्त्यावरची खडी निघून जात आहे. यावर ‘लोकमत’नेही वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता नागरिकच या रस्त्यांच्या दर्जाबाबत बोलू लागले आहेत.