इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर स्मारक समिती आणि क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेच्यावतीने राज्यातील स्त्रियांच्या चळवळीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगमनेर (जि. अहमदनगर) येथील स्त्री मुक्ती चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या अॅड. निशा शिवूरकर यांना ‘क्रांतिवीरांगना-इंदूताई पाटणकर’ स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
बुधवारी कासेगाव येथील क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हमाल-मापाडी चळवळीचे नेते विकास मगदूम यांच्याहस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी माणदेशी महिला बॅँकेच्या संस्थापक-अध्यक्षा चेतना सिन्हा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. पाटणकर यांनी केले आहे.