पतसंस्थेच्या वार्षिक सभेत मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘इंद्रप्रस्थ’चे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : केवळ ठेवी घेऊन कर्जे देणे आणि नफा कमविणे एवढाच हेतू समोर ठेवू नये. सर्वसामान्य व्यापारी, भाजीविक्रेते आणि पत नसणाऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वावलंबी बनवावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष, इंद्रप्रस्थ संस्थेचे संस्थापक दिलीप पाटील यांनी केले. ते २७ व्या वार्षिक सभेत बोलत होते.
प्रारंभी दिलीपराव पाटील, विनायकराव पाटील, बाळासाहेब पवार यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
या पतसंस्थेच्या सांगली, आष्टा, शिराळा, पलूस, मणेराजुरी येथे असलेल्या शाखा उत्तमप्रकारे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत तासगाव, भिलवडी, लाडेगाव फाटा, इस्लामपूर बसस्थानक परिसर येथे नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. संस्थेच्या ५५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. १०० कोटी ठेवींचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आगामी वर्षात ठेवले आहे.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी स्वागत केले आणि संस्थेचा आढावा घेतला. सभेची ऑनलाईन प्रक्रिया सहकार प्रशिक्षण केंद्राचे सतीश होनराव यांनी राबविली. या सभेस शशिकांत पाटील, जीवन पाटील, प्रसाद तगारे, विजयकुमार पाटील, संग्रामसिंह पाटील, सुहास घोरपडे, सुहास हांडे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बजरंग गावडे यांनी सूत्रसंचालन केले.