सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण वाढल्याचा प्रतिकूल परिणाम रक्तसंकलनावर झाला आहे. लस घेतल्यानंतर १४ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही, त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची चणचण निर्माण झाली आहे.
रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरांसाठी तरुण मंडळे, संस्थांना आवाहने केली आहेत. नियमितपणे शिबिरे घेणाऱ्या संस्थांशीही संपर्क साधला आहे. कोरोनाची लाट कमी होताच रुग्णालयांत शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच रक्ताची गरजही वाढली आहे. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शिबिरे थांबली आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने स्वेच्छा रक्तदातेदेखील रक्तपेढ्यांमध्ये येण्यास कचरत आहेत. त्यामुळेही रक्तटंचाई निर्माण झाल्याचे रक्तपेढीचालकांनी सांगितले. कोरोना संसर्गातून बाहेर पडलेल्यांना रक्तदान करता येत नसल्याचाही फटका बसला आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांत लसीकरणानेही वेग घेतला आहे. आठवड्याला लाखभर डोस मिळत आहेत. त्यामुळे शहरे व ग्रामीण भागात सर्वत्र लसीकरण वेगाने सुरू आहे. दररोज सरासरी २५ ते ३० हजार लोकांना लस टोचली जात आहे. लस घेतल्यानंतर किमान १४ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे हे नागरिकदेखील रक्तदानापासून दूरच राहिले आहेत.