सांगली : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत, अनेक गावांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तात्काळ रुग्णालयातील बेडची संख्या वाढवावी, किमान एक हजार बेड वाढतील अशी व्यवस्था करा, अशी मागणी कोरोना रुग्ण साह्य व समन्वय समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्याची महती वेगवेगळ्या माध्यमातून जगभर पसरलेली आहे. त्यामध्ये तत्कालीन प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते, खेळाडू, व्यापार व उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने अनेकांनी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. पालकमंत्री जयंत पाटील हे महाराष्ट्रातील एक मुरब्बी राजकीय नेते म्हणून परिचित आहेत. राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यामागे पतंगराव कदम यांचा मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी आणखी प्रयत्न केले तर कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकते. जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणत ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. मिरज सिव्हिल, मिरज वॉन्लेस हॉस्पिटल, इस्लामपूरचे प्रकाश हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल या ठिकाणी बेड वाढवता येतील.
या सर्व ठिकाणी किमान एक हजार ते बाराशे बेड तयार होऊ शकतात. राज्याचे अन्न व औषध प्रशासन सचिव यांच्या नवीन आदेशानुसार कोल्हापूर ऑक्सिजन प्लांटमधून होणारा ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. त्यामुळे किमान रोज पाच ते सात टन ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे. त्याबाबतही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.