इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेच्या वतीने शहरात उभारलेल्या फोर जी वाय-फाय सेवेचा लोकार्पण सोहळा ७ सप्टेंबर रोजी (सोमवारी) आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते आणि इस्लामपूरची नात असणाऱ्या सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी व मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांनी पत्रकार बैठकीत दिली.झिंझाड म्हणाले, शहरातील १२ ठिकाणी फोर जी वाय-फाय सेवेचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या सर्व सुविधेची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे. ‘ब’ वर्ग स्तरातील पालिकेमार्फत संपूर्ण शहरात फोर जी वाय-फाय सेवा देणारे देशातील हे पहिले शहर ठरले आहे. नगरपालिका कार्यालय व प्रशासकीय इमारत अशा दोन ठिकाणी इन आणि आऊटडोअर सेवा दिली आहे. उर्वरित ठिकाणी फक्त आऊट डोअर सेवा मिळणार आहे. जेथे टॉवर आहे, तेथून ९0 मीटर वर्तुळाकार अंतरापर्यंत या सेवेचा परीघ आहे. संपूर्ण शहरात ही सेवा देणारे इस्लामपूर हे देशातील पहिले शहर ठरले आहे. डिसेंबरपर्यंत ही सेवा मोफत मिळेल. सोमवारी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात वाय-फाय सेवेचा लोकार्पण सोहळा होईल. या सेवेसाठी विशेष मार्गदर्शन करणारे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, उमेश सुर्वे यांची उपस्थिती असणार आहे.नियोजक सभापती खंडेराव जाधव, दिनकर पाटील, पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, शंकरराव चव्हाण, सदानंद पाटील, सुभाष देसाई, अशोक इदाते, संभाजी कुशिरे उपस्थित होते. (वार्ताहर)
इस्लामपुरात सोमवारी वाय-फाय सेवेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2015 21:56 IST