सांगली : शहरात विविध कामांसाठी महावितरण कंपनीकडून मंगळवारी पाच तास वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याने दोन दिवस सांगली व कुपवाड या दोन्ही शहरांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
महावितरण कंपनीने शहरात पावसाळापूर्व कामांना गती दिली आहे. वीज तारांना अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेतले आहे. मंगळवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. याचकाळात उपकेंद्रातील ट्रान्सफाॅर्मरची देखभाल, दुरुस्तीही केली जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत शहरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. कृष्णा नदीवरील जॅकवेल व हिरा बाग येथील पाणीपुरवठा यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने मंगळवारी सायंकाळी व बुधवारी सकाळच्या सत्रात शहरातील नागरिकांना कमी दाबाने व अपुऱा पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.