सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ वंचित गावांना कर्नाटक सरकार तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यास तयार नाही. यामुळे महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने सुधारित म्हैसाळ योजनेतून पाणी देण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कृष्णेचा महापूर आणि जत तालुक्यातील वंचित ६५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. येडीयुरप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, बैठकीतून फारसे काहीच हाती लागले नसल्याचे दिसत आहे. कृष्णेचा पूर आणि जतच्या ६५ गावांच्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन राज्यांतील जलसंपदा विभागातील अभ्यासू अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. दोन राज्यांतील अधिकाऱ्यांमध्ये संवाद झाला आहे. कर्नाटक सरकारने तुबची-बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागातील गावांना पाणी देण्यास नकार दिला आहे. या उलट कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणाजवळ कर्नाटक सरकारची कोटलगी प्रस्तावित योजना आहे. या योजनेतून महाराष्ट्राने पाणी योजना करून जतला पाणी द्यावे, अशी भूमिका कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. कोटलगी योजनेतून जतसाठी योजना करणे महाराष्ट्राला तांत्रिकदृष्ट्या परवडणारे नाही. कारण, कोटलगी येथे कृष्णा नदीत जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांतच पाणी उपलब्ध असते. उर्वरित आठ महिने पाणीच उचलता येणार नसल्यामुळे कोटलगीतून पाणी योजना करणे जत तालुक्यासाठी फायदेशीर नसल्याचे महाराष्ट्राच्या जलसंपदा अधिकाऱ्यांचे मत आहे.
कर्नाटक सरकारची भूमिका लक्षात घेऊनच महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून जत तालुक्यातील पूर्णतः वंचित ४८ गावे व अंशतः वंचित १७ गावांसाठी ८३८ कोटींची नवी विस्तारित योजना आणली आहे. मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन (बेडग, ता. मिरज) मधून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी पाच टीएमसी राखीव पाण्याची तरतूद असेल. त्यातून ६५ गावांतील वीस हजार ३४३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
चौकट
म्हैसाळ सुधारित योजना
म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीन बेडगमधून तीन टप्प्यात १८० मीटर इतक्या उंचीवर पाणी नेले जाईल. पूर्णत: बंदिस्त पाईपव्दारेच सुधारित योजना असणार आहे. बेडग ते बसाप्पाची वाडी नाला, बसाप्पाचीवाडी ते मिरवाड तलाव आणि मिरवाड तलाव ते मल्ल्याळ हौद असे तीन टप्पे असतील. मल्ल्याळ डोंगरावरून नैसर्गिक उताराने हे पाणी जत तालुक्यातील कोसारी ते उमदी पंचक्रोशीतील सर्व गावांना देता येईल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
कोट
कर्नाटकच्या प्रस्तावित कोटलगी योजनेतून जतला पाणी देणे सोयीचे नाही. यामुळे बंदिस्त पाईपव्दारेच म्हैसाळ सुधारित योजनेतून जतच्या वंचित गावांना पाणी देणे सोयीचे आहे. कृष्णा लवादानुसार बिगर सिंचनासाठी ३३ टीएमसी पाण्याची तरतूद असून त्यापैकी ९ टीएमसी इतक्याच पाण्याचा वापर होतो. जास्तीत जास्त २० टीएमसी पाणी वापर होईल. म्हणजे १३ टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते. त्यापैकी पाच टीएमसी जतच्या वंचित गावांसाठी उपलब्ध करून दिले जाईल.
- हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे.