मिरज : कविता स्वांतसुखायच असते. कोणतेही लेखन अंगीकृत भूमिकेला बगल देऊन करता येत नाही. कवी, लेखक मुळातच अव्वल असावा लागतो. लेखन परिसरसापेक्ष असत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. मिरजेत ‘काव्यमनीषा’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
मनीषा रायजादे यांच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा. महाजन, कवी-गझलकार सुधाकर इमामदार, साहित्यिक आनंदहरी, कवी दयासागर बन्ने, कवयित्री मनीषा पाटील यांच्या हस्ते झाले. परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. महाजन म्हणाले की, कविता अनमोल असते. कवीला समाजाचे सहकार्य मिळायला हवे. मनीषा रायजादे यांची कविता साहित्यिक ग. दि माडगूळकर यांच्या शैलीसारखी सुलभ, सहज, सोपी आहे. कविता अंतरंगात रुजते. स्वत:चा स्वतःशी वाद असल्याशिवाय, भांडण असल्याशिवाय चांगले लेखन करता येत नाही.
यावेळी प्रा. वसंत खोत, मेहबूब जमादार, प्रा. अनिलकुमार पाटील, नामदेव भोसले, गौतम कांबळे, विजय जंगम, सुहास पंडित, अश्विनी कुलकर्णी, चित्रकार सुमेध कुलकर्णी, त्रिशला शहा, शाहीर पाटील, निर्मला लोंढे, मुबारक उमराणी, उज्वला केळकर उपस्थित होते. वैभव चौगुले व जस्मिन शेख यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर पाटील यांनी प्रास्ताविक केले. अलका रायजादे- पाटील यांनी आभार मानले.