लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुक्त गाव करण्यासाठी सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सरपंचांबरोबरच गावचे ग्रामस्थही त्यांच्या पाठीशी राहिले. कोरोना गावमुक्तीत कुटुंबातील महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
जिल्ह्यातील गावांच्या सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीव्दारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमध्ये कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावचे सरपंच विजय मोहिते, कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळीच्या सरपंच नीता जाधव, वाळवा तालुक्यातील आष्टा-नागावचे उपसरपंच धनवंतराव पाटील यांच्याशी ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे आदी उपस्थित होते.
उध्दव ठाकरे म्हणाले, गेली दीड वर्षे आपण कोरोनाशी लढत आहोत. कोरोनाची पहिली लाट संपली आता दुसरी लाट सुरू आहे. ही लाट अत्यंत भयावह आहे. या लाटेत अनेकांनी आपले आप्तेष्ट, स्वकीय गमावले. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. असल्या भयावह लाटेतही काही ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कोरोना नियंत्रणाचे काम केले. त्यामुळे कोरोनाला अटकाव करू शकलो. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला तरीही आपण त्याच्यावर मात केली. त्यातच म्युकरमायकोसिस या रोगाचीही भर पडली. तरीही गावपातळीवर सावध राहून ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध बसला आहे.
चौकट
मोहित्यांचे वडगाव लवकरच कोराेनामुक्त
मोहित्यांच्या वडगावचे सरपंच विजय मोहिते यांनी कोरोनामुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली. गावात ६७ रुग्ण कोरोनाबाधित होते, त्यांच्यावर यशस्वीपणे उपचार केले. सध्या केवळ चार रुग्ण उपचार घेत असून, तेही आठवड्याभरात बरे होतील. गावातील महिला वर्गाला विश्वासात घेऊन कोरोना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केल्याने आणि गावातील महिलांनी तितक्याच चांगल्या पध्दतीने प्रतिसाद दिल्याने गाव कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.