लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणासाठी चारपट दंड आकारणीऐवजी सवलतीची अभय योजना लागू करावी. केवळ १० टक्के दंड, व्याज आकारणी करून साताबारावर नावे नोंद केल्यास लाखो नागरिकांना त्याचा लाभ होईल, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
पाटील यांनी मुंबईत मंत्री थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत विचारविमर्श करून लवकरच शासन निर्णय घेईल, असे आश्वासनही थोरात यांनी दिले. पाटील म्हणाले की, गुंठेवारीचे अनोंदणीकृत दस्तऐवज नोंदणी करून घेत असताना मुद्रांक शुल्क व चौपट दंड आकारला जातो. त्यामुळे सातबारावर नाव नोंद करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी पूर्वी सुरू असलेल्या अभय योजनेची मुदत वाढवावी. तसेच मुद्रांक शुल्कावर चौपट दंड न आकारता १० टक्के रक्कम दंड म्हणून घ्यावी.
हा आदेश पारित झाल्यास नागरिकांना जुन्या अभय योजनेप्रमाणे लाभ घेता येईल. त्याचा सांगली शहरातील ५० हजारांहून अधिक नागरिकांना होईल. नागरिकांचे लाखो रुपये वाचतील; तसेच शासनालाही प्रस्ताव नियमितीकरणातून जास्तीत जास्त महसूल मिळू शकेल. याबाबत शासन निर्णय झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गुंठेवारी नियमितीकरणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.