मिरज : मिरजेत शुक्रवार, दि. २५ रोजी नवव्यादिवशी शहरातील ११० व ग्रामीण भागातील ९२ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश तलावात व कृष्णा नदीपात्रात होणार आहे. सकाळपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या सवाद्य विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालणार आहेत. विसर्जन व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळांच्या बँड, बँजो, झांजपथक, ढोलपथकाच्या तालावर मिरवणुका निघणार आहेत. ११० मंडळांपैकी २० मंडळांच्या गणेशमूर्तींचे कृष्णा नदीपात्रात, २० मंडळांच्या गणेशमूर्तींचे खासगी विहिरीत व ७० मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन गणेश तलावात करण्यात येणार आहे. आरग, बेडग, मालगाव, टाकळी यासह पूर्व भागातील गावातील ९२ मंडळांच्या मूर्तींचे मिरवणुकीने विसर्जन करण्यात येणार आहे. मिरजेमध्ये गणेश तलावात व नदीपात्राजवळ विसर्जनासाठी महापालिकेने यांत्रिक बोट, तराफा, क्रेनची व्यवस्था केली आहे. रस्त्यावर मांसाचे पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी प्रतिबंधाच्या नोटिसा बजावल्या आहेत. कत्तलखान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी जनावरांच्या कतली होऊ नयेत यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. गणेश विसर्जन मिरवणुका व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (वार्ताहर)क्रेन नसल्याने विसर्जनास विलंबकृष्णा घाटावर महापालिकेची क्रेन नसल्याने सातव्या दिवशीची विसर्जन मिरवणूक पहाटे पाच वाजेपर्यंत रेंगाळली होती. गणेश तलावात मध्यरात्री एक वाजेपर्यंत सार्वजनिक मंडळांचे गणेश विसर्जन संपल्यानंतर कृष्णाघाटावर उंच गणेशमूर्तींचे विसर्जन क्रेनसाठी रेंगाळले होते. पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर क्रेन उपलब्ध होण्यासाठी चार तासांचा विलंब झाला. पहाटे पाच वाजता वेताळबानगर मंडळाच्या उंच मूर्तीचे विसर्जन होऊन मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरज शहरातील आज दोनशे मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2015 00:01 IST