संख : बेवनूर (ता. जत) येथे महसूल विभागाच्या दुर्लक्षाने डी. बी. एल. कंपनीने दगड उत्खनन सुरू केले आहे. खनिकर्म विभागाकडून २५ हजार ब्रास उत्खनन परवाना असताना जादा उत्खनन केले आहे. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
बेवनूर येथे दिलीप बिल्डकॉन कंपनीने गावापासून तीन किलाेमीटर अंतरावर कळवाल येथील नऊ एकर १० गुंठे जमीन घेऊन दगड उत्खनन सुरू केले आहे. दगडी खाणीजवळ लोकवस्ती आहे. खाणीतून बोअर ब्लास्टिंगच्या साहाय्याने खाेदकाम करीत असताना दगड बाहेर पडतात. यामुळे परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. उत्खनन क्षेत्राभोवती निकृष्ट दर्जाचे संरक्षित कुंपण घातले आहे. ते काढून चांगल्या दर्जाचे लोखंडी जाळीचे कुंपण उभारावे. लोकवस्तीमध्ये दगड येणार नाहीत यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांकडून लेखी हमीपत्र मिळावे. उत्खनन क्षेत्राशेजारी सेफ झोन सोडलेला नाही. ६ मीटरपर्यंत उत्खननाचा परवाना असताना ३० मीटरपर्यंत उत्खनन केले आहे. यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. खनिकर्म विभागाकडून २५ हजार ब्रास उत्खनन परवाना असताना जादा उत्खनन केले आहे. कंपनीने अटी-शर्तींचे पालन केलेले नाही.
या बेकायदेशीर उत्खननाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून पंचनामा करावा. दाेषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणस्थळी नायब तहसीलदार माळी यांनी भेट दिली. उपोषणात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक, बापूसाहेब शिंदे, तानाजी शिंदे, संदीप नाईक, बबन शिंदे, राजेंद्र शिंदे, भारत शिंदे, मच्छिंद्र शिंदे, राजाराम व्हनमाने, संदीप शिंदे, संभाजी शिंदे, मोहन पाटील यांनी भाग घेतला.
फोटो : १३ संख ४
ओळ : बेवनूर (ता. जत) येथे अवैध गौण खनिज उत्खनन बंद करावे, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.