चिकुर्डे (ता. वाळवा) येथील युवकांचे आयडॉल, कुशल संघटक व शिवसेना नेते अभिजित पाटील यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त...
अभिजित पाटील यांना ‘आबा’ या नावाने संबोधले जाते. त्यांचे शिक्षण एम.बी.ए. झाले असतानादेखील नोकरी व व्यवसायाच्या पाठीमागे न लागता गावातील व आपल्या परिसरातील लोकांच्या विकासाचा ध्यास घेऊन राजकारण व समाजकारणास सुरुवात केली. चिकुर्डे गावामध्ये दूध संस्था, पतसंस्था व इतर संस्थांच्या उभारणीत व त्या सुव्यवस्थितपणे सुरू ठेवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खासदार व आमदार यांच्या विजयश्रीत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
सध्या कोरोनाच्या हाहाकाराने देश हादरला आहे. या महामारीतदेखील अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत व कोरोना कमिटीने उत्कृष्ट कार्य सुरू ठेवले आहे. येथे शासकीय कोरोना कमिटीसह तंटामुक्ती समिती अध्यक्ष, दक्षता कमिटी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व इतर होतकरू लोकांना घेऊन जम्बो कमिटी बनवली आहे. ही कमिटी दररोज ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेत आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर समिती सदस्य गावामध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने आरोग्य सेवा पुरविणे व इतर उपाययोजना करत आहेत. गावच्या लोकसंख्येच्या मानाने येथे कोरोना रुग्णाचे प्रमाण अत्यल्प आहे, त्याचे सर्व श्रेय अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या कमिटीला जाते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज किंवा उद्या कोविड रुग्णालय सुरू होत आहे. यासाठी अभिजित पाटील यांनी सतत पाठपुरावा केला आहे. सध्या गावांमधून कोरोनाला हद्दपार करून कोरोनाविरुद्ध लढा जिंकणे हेच आपले ध्येय असून, त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा संकल्प त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला जात आहे.
- कृष्णात पवार, माजी सरपंच, चिकुर्डे
शब्दांकन -शंकर शिंदे, ऐतवडे बुद्रूक