फोटो-१४ दत्ताजीराव पोटे
- विकास शहा
शिराळा येथील नागपंचमीला जागतिक पातळीवर प्रसिद्धी देणारे ज्येष्ठ समाजसेवक, साळी समाजाचे राज्यस्तरीय मार्गदर्शक नेते दत्ताजीराव ऊर्फ आण्णा पोटे यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन...
सण १९६८ मध्ये ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर तसेच दोन परदेशी पर्यटकांना या ठिकाणी होणारी जिवंत नाग पूजा करून नागपंचमी पाहण्यासाठी बोलावले होते. ही नागपंचमी पाहून किर्लोस्कर यांनी त्यांच्या ‘नॅशनल जिओग्राफी’ मासिकात लेख प्रसिद्ध केला. यामुळे नागपंचमी संपूर्ण जगाला माहीत झाली. यानंतर मोठ्या प्रमाणात देश-परदेशातील नागरिक ही नागपंचमी पाहण्यासाठी येऊ लागले. यासाठी कोणी पुढाकार घेतला असेल तर ते म्हणजे दत्ताजीराव (आण्णा) पोटे हे होय.
आण्णा लहानपणापासून त्यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी धोंडीराम पोटे यांच्यासह अन्य स्वातंत्र्यसैनिकांना जेवणाचे डबे देणे, निरोप पोहोचवण्याचे काम करत होते. जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य असताना माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, वि. स. पागे, स्वामी रामानंद भारती, राजारामबापू पाटील, आनंदराव नाईक, विश्वासराव नाईक, सर्जेरावदादा नाईक, जयसिंगराव नाईक, माजी कृषिमंत्री शरद पवार, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक आदी त्यांचे घरी आले होते.
दत्ताजीराव पोटे हे १९५७ मध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, शिराळा ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांवर काम केले. शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या तोरणा ओढ्याची स्वच्छता, वृक्षारोपण आदी सामाजिक कार्यात ते सहभागी होता. त्यांनी हॉटेल व्यवसायात एक आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.