सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीवेळी मला कोरोना झाला होता. त्यामुळे माझा कुणाशीही संपर्क नव्हता. त्या काळात स्थानिक मंडळींनी काय ठरविले, हेही मला माहीत नाही. कोरोना झाल्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्यामुळे महापालिकेतील सत्तांतराशी माझा संबंध नाही, अशी टोलेबाजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केली. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी संपर्क साधून इच्छा असतानाही बैठकीला उपस्थित राहता येत नसल्याचे कळविल्याने त्यांचा बहिष्कार असल्याचे मी मानत नाही, असा चिमटाही काढला.
महापालिकेतील सत्ता परिवर्तनानंतर पालकमंत्री जयंत पाटील प्रथमच महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्तांतराबाबत विचारता पाटील म्हणाले की, कोरोना झाल्यामुळे मी क्वारंटाईन होतो. त्याकाळात माझा कुणाशीही संपर्क नव्हता. माझ्या कोरोनाचा गैरफायदा घेतला. सत्तांतरांशी माझा संबंध नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक मंडळींनीच सारे ठरविले; पण आता झालेल्या गोष्टीला आपण तर काय करणार, असे म्हणत स्मित हास्य केले.
भाजप नगरसेवकांच्या बहिष्काराबाबत ते म्हणाले की, कुठे आहे बहिष्कार, साऱ्यांशीच चांगले संबंध आहेत. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी दूरध्वनी करून बैठकीला येण्याची इच्छा व्यक्त केली; पण पक्षीय अडचणीमुळे येऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपचे सहा ते सात नगरसेवक उपस्थित होते, असे म्हणत बहिष्काराच्या इशाऱ्यातील हवा काढून घेतली.
चौकट
महापालिकेत शाही स्वागत
सत्ता परिवर्तनानंतर प्रथमच जयंत पाटील महापालिकेत येत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या स्वागताची शाही तयारी केली होती. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालण्यात आला होता. ढोल पथकाचा गजरही सुरू होता. दोन्ही बाजूला फुलांची रांगोळी होती, तर पहिल्या मजल्यापासून मुख्य सभागृहापर्यंत रांगोळी काढण्यात आली होती. जयंत पाटील व विश्वजित कदम यांचे आगमन होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महिला नगरसेवकांनी दोघांचेही औक्षण केले.
चौकट
नवीन एमआयडीसी विकसित करणार
जयंत पाटील म्हणाले, शहरातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्याशिवाय महापालिकेचे उत्पन्नही वाढणार नाही. त्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. सांगलीपासून पंधरा-वीस किलोमीटर परिसरात नवीन एमआयडीसी विकसित करण्याची गरज आहे. त्यामध्ये दोन-तीन मोठे उद्योग आले तर सात-आठ हजार लोकांना रोजगार मिळेल. कवलापूर विमानतळाच्या सुमारे शंभर एकर जागेवर नवीन उद्योग आणण्यासाठीही प्रयत्न केले जातील.
चौकट
फुटीर नगरसेवकांची उपस्थिती
जयंत पाटील यांच्या आढावा बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला होता. स्थायी सभापती, सभागृह नेत्यांसह नगरसेवकांनी पाठ फिरविली होती; पण भाजपच्याच सहा फुटीर नगरसेवकांसह सहयोगी विजय घाडगे यांनी मात्र बैठकीला हजेरी लावत भाजप नेत्यांच्या आदेशाला कोलदांडा दिला.