अशोक डोंबाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अध्यापक शिक्षण पदविका (डीएड) अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जासाठी संघर्ष करावा लागत होता. एवढे करूनही प्रवेशात क्रमांक लागतो की नाही, याची धास्ती होती. मात्र, गुरुजी बनविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला आता वनवास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १६ कॉलेजमध्ये ७३० जागांपैकी केवळ ३५५ अर्ज आले आहेत. डीएड अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी गुरुजी बनतात. मात्र, नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा ‘सीईटी’ देणे अनिवार्य असते. दरम्यान सीईटी भरती प्रक्रियेवेळी संस्थाचालकांची अपेक्षापूर्ती करताना दमछाक होते. अशा काही कारणांमुळे विद्यार्थी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवू लागल्याचे मानले जात आहे. संस्थांमध्ये वशिला व पैसा नसल्याने डिग्री घेऊनही फायदा नसल्याने फक्त लग्नपत्रिकेत डीएड मिरवण्यासाठीच पदवी घेऊन काय फायदा, अशी खिल्ली उडविली जात असल्याने डीएडकडे पाठ फिरविण्यात येत आहे. बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य काही अभ्यासक्रमांकडे आकर्षित होत असल्याने ते गुरुजी बनण्यास नाखुश असल्याचे दिसत आहे.
चौकट
म्हणून इतर अभ्यासक्रमांना घेतला प्रवेश
कोट
डीएड शिक्षण घेण्यास दोन वर्षे घालवायची आणि पुन्हा शासनाची सीईटी परीक्षा द्यावी लागत आहे. ही परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर असल्यामुळे उत्तीर्ण होईल, याची खात्री नसते. म्हणूनच शिक्षक होण्याची इच्छा असूनही अभियांत्रिकीला प्रवेश घेतला.
-सचिन माने, विद्यार्थी, कवठेमहांकाळ.
कोट
चांगल्या गुणासह डीएड पूर्ण केल्यानंतरही नोकरीची खात्री नाही. सहा वर्षांत शिक्षकांची भरतीच झाली नाही. खासगी संस्थाकडे नोकरीसाठी पंधरा ते वीस लाख रुपयांपर्यंतची मागणी केली जात आहे. यामुळेच डीएड न करता बीफार्मसीला प्रवेश घेतला आहे.
-माधवी लोहार, विद्यार्थिनी, सांगली.
प्राचार्य म्हणतात...
चौकट
कोट
विद्यार्थ्यांचा ओढा मेडिकल, इंजिनिअरिंगसह इतर क्षेत्राकडे असल्याचे दिसते. तेथे नंबर लागला नाही तर इकडे प्रवेश प्रकिया वाढण्याची अधिक शक्यता आहे. तुलनेत प्रतिसाद कमी मिळत आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन प्रवेश घ्यावा.
- डॉ. रमेश होसकुटे, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, (डाएट)
कोट
आमच्या कॉलेजमध्ये ४० विद्यार्थ्यांची क्षमता असून त्यापैकी सर्व ४० जागा भरल्या आहेत. दहा विद्यार्थी वेटिंगवर आहेत. या वर्षी डीएड अभ्यासक्रमासाठी चांगला प्रतिसाद मिळला आहे.
-लक्ष्मी पाटील, प्राचार्या, डीएड कॉलेज,
चौकट
-जिल्ह्यातील डीएड कॉलेज संख्या : १६
-एकूण जागा : ७३०
-आलेले अर्ज : ३५५
चौकट
नोकऱ्यांची कमतरता
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मागील दहा वर्षांत राज्यात दरवर्षी ८० हजारांच्या आसपास विद्यार्थी डीएडची पदविका घेऊन बाहेर पडले आहेत; पण त्या तुलनेत नोकऱ्या उपलब्ध झालेल्या नाहीत. गेल्या सात वर्षांत शासनामार्फत शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही. नोकरीची हमी नसल्यामुळेच विद्यार्थ्यांनी डीएड अभ्यासक्रमांकडे पाठ फिरविली आहे.