लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनाने मागील वर्षी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीपासून अद्याप जिल्ह्यातील शेकडो कामगार वंचित आहेत. यंदा जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे. त्यामुळे सरसकट कामगारांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अमित कदम यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त व शासनाच्या बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या सचिवांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जून महिन्यात सांगली कार्यालयाकडून ऑफलाईन सुटलेल्या यादीत काही कामगारांची नावे चुकल्याने त्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना मदत द्यावी.
शासनाने जाहीर केलेली १,५०० रुपयांची मदत पुरेशी नाही. ऑनलाईन पद्धतीने स्मार्टकार्ड काढलेल्या ठराविक लोकांनाच मदत मिळाली आहे. त्यामुळे सरसकट सर्व कामगारांना मदत द्यावी, कामगारांसाठी ठिकठिकाणी बेड राखून ठेवावेत, मंडळामार्फत जिल्ह्यात कोविड सेंटर सुरु करावे, मध्यान्ह भोजन योजना पुन्हा सर्वत्र सुरु करावी. मंडळाकडे कामगार कल्याणचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, तो या संकटकाळात कामगारांसाठी वापरावा. त्यातून अडचणीत सापडलेल्या कामगारांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.