सांगली : महापालिकेकडील पाणी, ड्रेनेजसह विविध योजनांसाठी शंभर कोटी रुपयांचे कर्ज उभारणीला विरोधी नगरसेवकांनी विरोध केला. कर्ज घेतले तरी ते महापालिका कसे फेडणार, याची माहिती द्या, मगच कर्ज काढा, अशी सूचनाही सदस्यांनी केली. सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र कर्ज काढण्यावर ठाम होते. शासकीय योजना अर्धवट अवस्थेत आहेत. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. योजनांच्या पूर्ततेसाठी कर्ज आवश्यकच असल्याचे मतही सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केले. महापालिकेकडून शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी कर्ज उभारले जाणार आहे. त्यासंदर्भात गुरुवारी सत्ताधारी काँग्रेसने पुढाकार घेत सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला महापौर विवेक कांबळे, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती किशोर जामदार, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते शिवराज बोळाज, आयुक्त अजिज कारचे उपस्थित होते.बैठकीत सत्ताधारी व प्रशासनाने कर्जाचा आढावा घेतला. पाणी व ड्रेनेज या दोन योजनांसाठी शंभर कोटी रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व बोळाज यांनी आक्षेप घेतला. कर्जापेक्षा उत्पन्नाचे स्रोत वाढविले पाहिजेत. प्रशासनाने एलबीटी वसूल केलेला नाही. तेथून कोट्यवधी रुपये वसुली होऊ शकते. ड्रेनेज योजनेवर ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यातील एकही लाईन सुरू नाही. त्यामुळे पाच ते सात कोटीचा ड्रेनेज कर वसूल होऊ शकत नाही. या मुद्द्यांचा प्रशासनाने काय विचार केला आहे? कर्ज घेतले तरी ते कसे फेडणार आहात?, अशा प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधाऱ्यांनी मात्र, कर्जाशिवाय योजना पूर्ण होऊ शकत नाही, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी भूमिका घेतली. (प्रतिनिधी)पाणी, ड्रेनेज योजना सुरू करताना महाआघाडीने त्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना आखल्या नाहीत. आता या योजना अर्धवट स्थितीत आहेत. निधीअभावी त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यासाठी कर्ज हाच पर्याय आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी पालिकेकडे पुरेशी तरतूद आहे. पाणीपट्टी, घरपट्टीचे उत्पन्न वाढत आहे. त्यातून वर्षाकाठी दहा कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळले. त्याचा अहवाल प्रशासनाला देण्याची सूचना केली आहे. सर्वच पक्षांना विश्वासात घेऊन कर्जाचा निर्णय होईल. त्यासाठी प्रसंगी आणखी एक व्यापक बैठक घेण्याची तयारी आहे. - संतोष पाटील, स्थायी समिती सभापतीकांबळे-सूर्यवंशी वादबैठकीत महापौर विवेक कांबळे व विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्यात वाद झाला. सूर्यवंशी यांनी घेतलेल्या आक्षेपाला महापौरांनी हरकत घेतली. आपण सत्ताधारी आहोत, विरोधकांना काय विचारचे? आपण कर्जाचा निर्णय घेऊया, असे महापौर कांबळे म्हणताच, सूर्यवंशी यांनी बैठक अर्धवट सोडून तेथून निघून जाणेच पसंत केले.
महापालिका कर्ज फेडणार कसे?
By admin | Updated: November 27, 2015 00:05 IST