अंजर अथणीकर ल्ल सांगली जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असणारी जिल्हा वार्षिक योजना यावर्षी १९८ कोटी ५० लाखांची करण्यात आली आहे. गतवर्षीपेक्षा यामध्ये तब्बल २३ कोटींची वाढ करण्यात आली आहे. लवकरच नियोजन समितीची बैठक बोलावण्यात येणार असून, यामध्ये नव्या कामांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समित्यांनाही व्यापक अधिकार दिल्याने आता जिल्हा नियोजन समित्याही बळकट बनल्या आहेत. आराखड्यास आता जिल्हास्तरावरच प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली जात आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा वार्षिक योजना आराखड्याच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. २००९-१० मध्ये जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याअंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी ९९ कोटी १३ लाखांची तरतूद होती. २०१४-२०१५ या वर्षासाठी ती १७५ कोटींची करण्यात आली होती. आता आगामी वर्षभरासाठी १९८ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधित जिल्हा वार्षिक योजना आराखड्याची तरतूद दुपटीपर्यंत झाली आहे. वार्षिक योजना आराखड्यात जिल्ह्यातील शेती विकास आणि जलसंधारण कामांबरोबरच रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी, कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मच्छ व्यवसाय, वन पर्यटन व इकोटुरिझम, सहकार, पाटबंधारे व पूर नियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, तंत्रशिक्षण, पर्यावरण, सामान्य आर्थिक सेवा, सामाजिक व सामूहिक सेवा, क्रीडा व युवक कल्याण, नगरविकास, मागासवर्गीयांचे कल्याण, कला व संस्कृती, महिला व बालविकास अशा योजनांसाठी जिल्हा वार्षिक आराखड्यात सर्वसाधारण योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षामध्ये यातील काही योजनांना मंजुरी देण्यात आली असून, आता उर्वरित नियोजनाच्या निधीला मंजुरी देण्यात येणार आहे. यासाठी मे अखेरपर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.
नवा नियोजन आराखडा दोनशे कोटींच्या घरात
By admin | Updated: May 11, 2015 00:37 IST