सांगली : शहरातील शंभरफुटी रोडवरील रमामातानगर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी रोख २ लाख रुपयांसह सोन्याचे दागिने असा चार लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी नाझमिन निजाम वाळवेकर (रा.पाकिजा मशिदीसमोर, शंभरफुटी रोड, सांगली) यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी वाळवेकर कुटुंबीयांसह रमामातानगर येथे राहण्यास आहेत. बुधवार दि. १८ रोजी दुपारी साडे बारा वाजता ते कुटुंबीयांसह परगावी गेले होते. या कालावधीत घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत, चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरात वाळवेकर यांनी दोन लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी यावर डल्ला मारला. गुरुवारी दुपारी वाळवेकर परगावहून परतल्यानंतर त्यांना चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर, त्यांनी तातडीने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. या परिसरात चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांनी त्या दृ्ष्टीने तपास सुरू केला आहे.