सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील ५४ लाखांच्या चाप कटर खरेदीवरून कृषी समिती सभापती आणि कृषी विकास अधिकाऱ्यांमध्ये आज (मंगळवारी) मानापमान नाट्य रंगले. आपल्या परवानगीशिवाय कृषी समितीची बैठक ठेवल्याचे कारण पुढे करून कृषी सभापती मनीषा पाटील गैरहजर राहिल्या़ त्यामुळे समितीचे सर्व सदस्य उपस्थित असूनही बैठक तहकूब करावी लागली़कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंगळवार, दि़ २४ रोजी समितीची बैठक असल्याचे पत्र समिती सदस्यांना पाठविण्यात आले होते़ त्यानुसार समिती सदस्य, माजी अध्यक्ष देवराज पाटील, दत्ताजीराव पाटील, प्रकाश देसाई, योजना शिंदे, मीनाक्षी आक्की, वाळव्याचे सभापती रवींद्र बर्डे, कवठेमहांकाळच्या सभापती वैशाली पाटील आदी सभापतींच्या दालनात बैठकीसाठी हजर होते़ जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारीही बैठकीस उपस्थित होते. परंतु, सभापतींच्या दालनामध्ये सभापतीच नसल्यामुळे सदस्यांचा पारा चढला़ त्या बैठकीस वेळेत का आल्या नाहीत, अशी विचारणा सदस्यांनी अधिकाऱ्यांकडे केली, तरीही अधिकाऱ्यांचे मौन होते़ शेवटी एका सदस्याने सभापती मनीषा पाटील यांच्याशी संपर्क साधला़ त्यावेळी बैठकीविषयी अधिकाऱ्यांनी आपल्याला कोणतीच कल्पना दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ सभापती आणि अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद नसेल तर, बैठकच कशासाठी बोलाविली, अशी टीका करून सदस्यांनी कृषी विकास अधिकारी आऱ जे़ भोसले यांना धारेवर धरले़ देवराज पाटील यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला़ अखेर आजची बैठक तहकूब केली़ सभापती पाटील यांच्याशी चर्चा करून दि़ २ मार्च रोजी बैठक घेण्याचा निर्णय झाला़दरम्यान, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या संघर्षामुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामावर त्याचा परिणाम होत असल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कृषी विभागातील या वादात कर्मचारीही भरडले जात असल्यामुळे अनेकांनी विनंती बदलीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (प्रतिनिधी)सभापतींच्या सूचनेनुसारच बैठक बोलाविलीसभापती पाटील यांच्या सूचनेनुसारच आम्ही मंगळवार, दि़ २४ रोजी कृषी समितीची बैठक घेतली होती़ त्यानुसार समिती सदस्यांशी पत्रव्यवहार केला होता़ तरीही त्या गैरहजर राहिल्यामुळे बैठक तहकूब करावी लागली, अशी प्रतिक्रिया कृषी विकास अधिकारी आऱ जे़ भोसले यांनी दिली़भोसले यांचा मनमानी कारभारनिकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करू नये, अशी सूचना दिली होती, तरीही कृषी विकास अधिकारी आऱ जे़ भोसले यांनी ५४ लाखांची चाप कटर खरेदी केली. त्यांचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारी आहेत़ त्यामुळे आम्ही चाप कटर पुरवठादाराला बोलावण्याची सूचना दिली, परंतु त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष करून, पुरवठादाराला धनादेश देण्याची फाईल वित्त विभागाकडे पाठविली. त्याला आपण विरोध केला असून, चौकशी झाल्याशिवाय धनादेश देऊ नये, अशी लेखी सूचना वित्त विभागाला दिली आहे़ आज कृषी समितीची बैठक घेण्याविषयी भोसले यांनी कल्पनाच दिली नाही, असा आरोप मनीषा पाटील यांनी केला.
सभापती-अधिकाऱ्यांत मानापमान नाट्य
By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST