शिरटे : संस्काराची शिदोरी लाभली असली की त्याच्या अंगात प्रामाणिकपणा हा ठासून भरलेला असतो. अशीच एक घटना किल्ले मच्छींद्रगड (ता. वाळवा) येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये घडली. येथील शाखाधिकारी अमोल पाटील यांनी दुसऱ्या बँकेतून जादा आलेली रक्कम परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.
मच्छींद्रनाथाच्या पायथ्याशी असलेल्या किल्ले मच्छींद्रगड येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील शाखाधिकारी अमोल पाटील यांनी शुक्रवार दि. ३ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी एका बँकेतून पैसे आणले. या बँकेत आवश्यक रकमेची मागणी केली तसे त्या बँकेनेही पाटील यांना मागणीप्रमाणे रक्कम अदा केली. पाटील यांनी ती रक्कम मोजून पहिली असता मागणी पेक्षा २५ हजार रुपये जादा असल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बॅंकेत संपर्क करून आपल्याकडे २५ हजार रुपये जादा आल्याची माहिती दिली. पाटील यांनी पैसे परत करून माणुसकीचे दर्शन घडविले.