लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील संजय नगर परिसरात पान दुकान फोडून २१ हजारांचा माल चाेरून नेणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. चेतन मनोहर जाधव (वय १९, रा. हाडको कॉलनी, सांगली) असे संशयिताचे नाव असून, अवघ्या सहा तासात संजय नगर पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवाप्पा संभाजी पारेकर (रा. अभिनंदन कॉलनी, संजय नगर) यांचे आनंद पार्क बसस्टॉपजवळ माऊली पान शॉप नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी दुकान फोडून दोन हजार १३० रूपयांसह बिडी बंडल, सिगारेट पाकिटेे असा २१ हजार ८७६ रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेची संजय नगर पोलिसात नोंद होती. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित चेतन जाधव व सार्थक सुनील सुतार यांनी पहाटे अडीचच्या सुमारास दुकान फोडून माल चोेरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चेतनला अटक करण्यात आली तर त्याचा साथीदार सार्थक सुतार पसार झाला आहे. चेतनकडून २० हजार २८६ रूपयांचा चोरीतील माल जप्त करण्यात आला आहे.