लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा काँग्रेस कमिटी आणि किसान काँग्रेसच्यावतीने शनिवारी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी नव्या कृषी विधेयकाची होळी करण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार, राज्यभर शेतकरी आंदोलन आणि संकल्प दिन करण्यात आला. त्यानुसार सांगलीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. ‘हमारा संकल्प राहुलजी को लाना है’ असा संकल्प यावेळी करण्यात आला.
केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘एक देश एक बाजारपेठ कायदा’, ‘करार शेती व्यवसाय कायदा’, ‘जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा’ हे तिन्ही कायदे रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच या कायद्यांची होळी करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी, किसान विरोधी’, ‘जो किसानो से टकरायेगा, वो मिट्टी में मिल जायेगा’, ‘काळा कायदा मोदींचा, शेतकऱ्यांच्या बरबादीचा’, अशा घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल दरवाढीविरोधात, बेरोजगारीविरोधात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजाभाभी पाटील, प्रा. नेमिनाथ बिरनाळे, अण्णासाहेब कोरे, महावीर पाटील, बिपिन कदम, नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, संतोष पाटील, अभिजीत भोसले, रवींद्र वळवडे, कयूम पटवेगार, आशा पाटील, क्रांती कदम, कीर्ती देशमुख, मालन मोहिते, देशभूषण पाटील, अल्ताफ पेंढारी, आयुब निशानदार, सोहेल बलबंड आदी सहभागी झाले होते.