लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदानित तुकड्या द्या, क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करा, यांसह १६ मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. तसेच शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन दिले.
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)चे अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर, सचिव बळीराज कसबे, उपाध्यक्ष वैभव माने, अरविंद मेनगुदले, कोषाध्यक्ष नामदेव कांबळे, सुभाष शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय आर्थिक लाभ व अनुकंपा योजनेखाली कायम नोकरी देण्यात यावी. कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या सेवापुस्तकांमध्ये नोंद करण्याची मागणी केली. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तरांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळाला पाहिजे. अनुदानासाठी अघोषित शाळा व तुकड्यांना अनुदान मंजूर करावे, थकीत वैद्यकीय बिल त्वरित मिळावेत, संस्थेत वाद असलेल्या ठिकाणी मुख्याध्यापक नियुक्तीस टाळाटाळ होत आहे. या ठिकाणी जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक नियुक्तीचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावेत, शाळांमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची तत्काळ नियुक्ती झाली पाहिजे, आदी मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.