आष्टा : वाळवा येथील अपना सहकारी बँकेचे शाखाधिकारी बाळकृष्णा नाना हजारे (वय ५७) यांनी बँकेचे थकित कर्ज भरण्यास दूरध्वनी केला, म्हणून विकास बाळासाहेब थोरात (रा. वाळवा) यांनी हजारे यांना दमदाटी करून जबर मारहाण केली. आज, शुक्रवारी दुपारी १२.३0 च्या सुमारास ही घटना घडली.आष्टा येथील अर्बन बँकेचे मुंबई येथील अपना सहकारी बँकेत विलीनीकरण काही वर्षापूर्वी झाले आहे. वाळवा येथील पूर्वीची आष्टा अर्बन बँक व सध्याच्या अपना बँकेच्या वाळवा शाखेत बाळकृष्ण नाना हजारे (५७, रा. वराडी, पो. उंब्रज, ता. कऱ्हाड) हे शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वाळवा येथील विकास बाळासाहेब थोरात यांना बँकेने १८ मार्च २0११ रोजी ५0 हजार रुपये कर्ज दिले आहे. त्याचे थकित २७५५ रुपये आजअखेर न भरल्याने शाखाधिकारी हजारे यांनी बँकेच्या दूरध्वनीवरून विकास थोरात यांना थकित कर्ज भरण्याबाबत फोन केला असता थोरात यांनी, मी मुंबईत आहे, असे हजारे यांना सांगितले. यानंतर हजारे यांनी तुम्ही नसाल तर घरातील आई—वडील अथवा पत्नीला थकित कर्ज भरण्यास बँकेत पाठवा, असे सांगितले व दूरध्वनी बंद केला. त्यानंतर थोरात यांनी बँकेत पुन्हा दूरध्वनी करून हजारे यांना ‘तू आमचा नोकर आहेस, नीट बोलायला शिक’ एवढे म्हणून दूरध्वनी बंद केला. १0 मिनिटांनी विकास थोरात बँकेत आले व ‘कोठे आहे मॅनेजर’ म्हणत हजारे यांना दमदाटी करीत मारहाण करू लागले.त्यांची कॉलर धरून बटणे तोडली. गळ्यातील चेन तोडून डोक्यात, चेहऱ्यावर मारहाण केली. टेबलवरील दूरध्वनीची वायर तोडून संगणकाचे नुकसान केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी थोरात यांना केबिनच्या बाहेर काढले. त्यानंतर थोरात गावातील नेताजी भास्कर पाटील यांना घेऊन पुन्हा बँकेत आले. दोघेही केबिनमध्ये घुसले व नेताजी पाटील यांनी हजारे यांच्या हाताला धरून बँकेच्या बाहेर आणले व शर्टची बटणे तुटलेली असतानाही बाजारपेठेतून फिरवीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३0 च्या दरम्यान घडली. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण करीत आहेत. (वार्ताहर)
बँकेच्या शाखाधिकाऱ्यास मारहाण
By admin | Updated: August 22, 2014 23:19 IST