लोकमत न्यूज नेटवर्क
कडेपूर : कडेगाव तालुक्यातील येडे उपाळे येथील काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांनी तर, हिंगणगाव बुद्रूक येथील ३१ कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.
कडेगाव नगरपंचायतीमधील भाजपचे नगरसेवक नितीन शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपही तयारीत होती. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय व सन्मानाची वागणूक दिली दिली जाईल, अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली.
तालुक्यात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. कडेगाव नगरपंचायतसह तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने चार जिल्हा परिषद गटांपैकी तीन जागा मिळविल्या, तर आठ पंचायत समिती गणांपैकी सहा जागा मिळविल्या होत्या. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू आहे.